विद्यार्थ्यांना प्यायला पाणीच नाही तर शाळा भरणार कशा ?
गेवराई तालुक्यातील शिक्षक व पालकांसमोर मोठा प्रश्न
====================
टँकरने पाणी द्या, नसता सुट्टी वाढवावी लागेल


====================

गेवराई ( प्रतिनिधी  ) दुष्काळाची गंभीर स्थिती असलेल्या गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात प्यायलाच पाणी नाही. अशा स्थितीत उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून सोमवारी दिनांक  17 जून रोजी सर्व शाळा सुरू होणार आहेत. परंतु  ग्रामीण भागातील बहुतांश शाळेत  प्यायला पाणीच नाही, मग शाळा भरवायची कशी ? असा प्रश्न  शिक्षक  व पालकांसमोर निर्माण झाला आहे.

        गेल्या चार वर्षापासून अत्यंत कमी पाऊस झाल्याने गेवराई तालुक्यामध्ये पिण्यास पाणी नसल्याने, दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सद्या गेवराई तालुक्यातील प्रत्येक गावात शासनाच्या वतीने दररोज जवळपास दोनशे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अनेक गावात टँकरची एकच फेरी होत असल्याने शेकडो नागरिक, महिला रात्रंदिवस या टँकरची वाट पाहत बसलेले असतात. ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमध्ये तर प्यायला पाणीच उपलब्ध नाही. शालेय परीक्षा संपल्यानंतर सर्व शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. त्या आता दिनांक 16 जून रोजी संपत असून, 17 जून सोमवार रोजी सर्व शाळा सुरू होत आहेत. परंतु शाळेमध्ये घोटभरही प्यायला पाणी उपलब्ध नसताना, शेकडो विद्यार्थी शाळेत आल्यावर त्यांना प्यायला पाणी द्यायचे कोठून ?  हा गंभीर प्रश्न संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकासमोर आ वासून उभा राहिला आहे. हवामान खात्याने या वर्षी बीड जिल्ह्यात मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचे सांगितले आहे. आज जून महिना सुरू होऊन अकरा दिवस झाले, तरी मान्सूनपूर्व पावसानेही अद्याप तालुक्यात म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. गावातल्या सार्वजनिक विहिरी आणि शेतात असलेल्या खाजगी विहिरी या पूर्ण आटल्या असून, हात पंपाना थेंबभरही पाणी नाही. बहुतांश शाळेमध्ये शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार मध्यान्न सुट्टीत दिला जातो. आता ही खिचडी बनवायची कशी ?विद्यार्थ्यांना प्यायला पाणी आणायचे कोठून ? या प्रश्नाने जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळेतील शिक्षकांना सळो की पळो करून ठेवले आहे. या गंभीर बाबीचा विचार शिक्षण विभागाने तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या महसूल विभागाने तात्काळ करावा आणि सोमवारपासून सुरू होणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना टँकरने का होईना पण पाणीपुरवठा करावा. नसता जोरदार पाऊस होऊन पाणी उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागेल. याशिवाय दुसरा पर्याय शिक्षकांसमोर राहणार नाही, असे चित्र गेवराई तालुक्यातच नव्हे तर बीड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये निर्माण झाले आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण टँकरवाल्याना शाळेत पाणी द्यायला सांगितले तरी ते त्यावर सहज अंमलबजावणी करतील अशी स्थिती नाही.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....