शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....

पश्चिम महाराष्ट्रात मोठमोठे पाण्याचे धरणं आणि
सत्ता देणाऱ्या बीड जिल्ह्यात मात्र पाण्याचे रिकामे टँकर ?
====================
शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....
====================



         महाराष्ट्राच्या राजकारणात विकास पुरुष शंकरराव चव्हाण यांच्यानंतर सर्वाधिक टिकून कोण असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन आणि त्यांचे मानसपुत्र समजले जाणारे शरद पवार यांनी आज पर्यंत पश्चिम महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशात राजकारण केले. गेल्या तीस ते चाळीस वर्षाच्या राजकीय प्रवासात एक वेळेसही पराभूत न झालेले शरद पवार बारामतीत केलेल्या विकासकामांमुळे राज्यात परिचित आहेत. पश्चिम महाराष्ट्रातला नेता असूनही, त्यांच्याकडे विकासाची दृष्टी असल्याने ते आपल्यासाठी काहीतरी नक्कीच ठोस काम करतील. तसेच शेतकऱ्यांविषयी आणि शेती विषयी जाणीव असल्याने निश्चितपणे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि विशेषतः मराठवाड्यात पाण्यासाठी ते काम करून, येथील शेतीला पुनर्जीवित करून शेतकऱ्यांना धनवान करतील अशी भाबडी अपेक्षा ठेवून आज पर्यंत पश्चिम महाराष्ट्रा पेक्षाही मराठवाड्यातील तमाम जनतेने शरदचंद्र पवार यांना जाणता राजा म्हणत डोक्यावर घेतले. राज्यात सर्वाधिक सत्ता भोगलेल्या आणि मुख्यमंत्री व केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम केलेल्या शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही चांगल्या योजना नक्कीच राबवल्या. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव आणि पिकाची नुकसान भरपाई देण्यामध्ये पवार साहेबांची भूमिका नेहमी आग्रही असते. परंतु ही पीक नुकसान भरपाई मिळवून घेताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळतात. त्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मात्र हजार आणि शंभर मध्ये ही मदत मिळते. त्याचे कारणही तसेच आहे, कारण मराठवाड्यामध्ये जलसंधारणाची कामे झाली असली तरी पाणीसाठा अत्यंत अल्प आहे. त्यामुळे येथील पिकेही कोरडवाहू आणि झालीच बागायती तर ऊस, कापूस या व्यतिरिक्त छोट्या-मोठ्या मोसंबी, डाळिंब, आणि पपईच्या बागा. परंतु पश्चिम महाराष्ट्रात पाणी भरपूर असल्याने ऊस तर सरसकट शेतकऱ्यांकडे आहेच, त्यासोबत  द्राक्ष, केळी या बागा मोठ्या प्रमाणात म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याकडे आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई मिळताना सुद्धा येथील शेतकऱ्यांना ती सर्वाधिक असते. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांना तसेच शेतकरी आणि जनावरांना पाणी मिळावे या उद्देशाने दूरदृष्टी ठेवून स्व शंकरराव चव्हाण यांनी आपली मोठी ताकत पणाला लावून, पैठण येथे गोदावरी पात्रावर नाथ सागर हे मातीचे सर्वात मोठे धरण उभा केले. आज मराठवाड्यात औरंगाबाद पासून ते नांदेड पर्यंतचे बशुतांश लोक याच पाण्यावर जिवंत आहेत.  शंकरराव चव्हाण यांच्यानंतर राज्याची सत्ता शरदचंद्र पवार साहेब यांच्या हातात आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात मराठवाड्यात एकही नाथ सागरासारखे मोठे धरण झाले नाही. चार धरण बांधली असती तर चित्र वेगळे पाहायला मिळाले असते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे आजही मोठा जलसाठा मराठवाड्याकडे उपलब्ध नाही. छोटे तलाव, ओढे- नाल्यावर बांधले गेलेले बंधारे तेही  निकृष्ट पद्धतीची झाल्याने त्यातही पाणी साठवले जात नाही. खऱ्या अर्थाने काबाडकष्ट करणारा शेतमजूर, शेतकरी हा मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आजही बीड जिल्ह्याची ओळख कोणाला पुसता आलेली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. गेल्या चार वर्षापासून सलग अत्यल्प पाऊस होत असल्याने मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. बहुतांश गावांना टँकरने पाणीपुरवठा करताना जलस्त्रोतही उपलब्ध नाहीत. आज एकही गाव असे नाही की त्या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा होत नाही. अशी स्थिती असेल तर बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वाधिक सत्ता भोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काय केले ? हा प्रश्न येथील नागरिकांना नेहमीच पडतो. म्हणूनच येथील जनतेने 2014 मध्ये लोकसभा आणि विधानसभा सोबतच 2019 च्या लोकसभेतही शिवसेना-भाजप युतीच्या पारड्यात आपला कौल दिला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही हा कौल तसाच कायम राहील यात शंका नाही. कारण एकेकाळी बीड जिल्ह्यात परळीत भाजपचे स्व गोपीनाथराव मुंडे सोडले तर सर्वच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येत होते. विधान परिषदेवरही येथीलच नेत्यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी बीड जिल्ह्यात सर्व मिळून बारा आमदार  व एक खासदार होते. एवढे भरभरुन प्रेम जिल्हावासीयांनी देऊनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कडून कोणतेही ठोस काम बीड जिल्ह्यात झाले नाही. आज गंभीर दुष्काळात पिण्याचे पाणी नसताना, उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याच्या आठ दिवस अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरदचंद्र पवार यांनी आपले नातू रोहित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्या मार्फत बीड जिल्ह्याला टँकर पाठवले आहेत. यामुळे लोकांत राष्ट्रवादी काँग्रेस विषयी आपुलकी निर्माण होईल असे वाटत नाही. कारण पश्चिम महाराष्ट्रात पाण्यासाठी मोठ मोठी धरणे बांधली आणि सत्तेत सर्वाधिक साथ देणाऱ्या, मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला मात्र पाण्याचे रिकामे टँकर पाठवण्यात आले. ही गंभीर स्थिती निर्माण करायला जबाबदार कोण  ? असा खडा सवाल येथील संतप्त नागरिक व शेतकरी उपस्थित करत आहेत. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जनतेने काँग्रेस - राष्ट्रवादीला नाकारून शिवसेना - भाजप युतीला कौल दिला असला तरी, गेल्या साडेचार वर्षात जल शिवारची कामे झाली असली तरी आज त्याचेही पाणी कोठे दिसत नाही. येणाऱ्या काळात युतीच्या नेत्यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ठोस कार्य करावे लागेल. नसता त्यांचेही काँग्रेस - राष्ट्रवादी सारखे हाल व्हायला वेळ लागणार नाही. कारण जुने, जाणते कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची संख्या कमी होऊन नव्या उमेदीचे, जिद्दीचे, अभ्यासू, युवा कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने आता राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय झालेले आहेत. येणाऱ्या काळात बीड जिल्हा खळखळत्या पाण्याने सुजलाम-सुफलाम करण्यासाठी तसेच रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्ग करण्यासाठी, जी राजकीय मंडळी काम करतील, त्यांच्या पाठीमागे येथील जनता ताकतीने उभा राहील. हे सांगायला कोण्या राजकीय जाणकार किंवा भविष्यकाराची गरज नाही. हा संदेश प्रत्येक गावागावातुन पहायला आणि ऐकायला मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श