जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी कामाला लागा --  बदामराव पंडित
====================
गेवराईतील शिवसेना भवनातून पुन्हा संपर्क केला सुरू

====================
गेवराई ( प्रतिनिधी ) राज्यात झालेल्या महायुती विरुद्ध महाआघाडीच्या तुल्यबळ लढतीत, भल्याभल्यांचा दारुण पराभव झाला आहे. आपण तर लोकभावनेचा आदर करून अपक्ष निवडणूक लढलो आहोत. अपक्ष असूनही मतदारसंघातील लाखो लोकांनी भरभरून प्रेम दिले तर 50 हजार मतदारांनी आवल्यावर विश्वास टाकून मतदान दिले आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी व शिवसैनिकांनी खचून न जाता प्रामाणिकपणे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कामाला लागावे. यापुढील काळात बीड जिल्ह्यात शिवसेना मजबूत करून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी 24 तास काम करणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केले आहे. यावेळी गहिवरलेल्या शिवसैनिक व कार्यकर्त्यांना त्यांनी मोठे बळ दिले आहे.
          गेवराई विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी न मिळाल्याने लोकभावनेचा आदर करत शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी विधानसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने, त्यांच्या विजयासाठी काम करणारे कार्यकर्ते व शिवसैनिक काही अंशी खचले होते. पराभवानंतर बदामराव पंडित यांना भेटण्यासाठी मतदार संघातल्या प्रत्येक गावातून आलेले कार्यकर्ते बदामराव पंडित यांना भेटताच गहिवरून अश्रू ढाळत होते. या सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की, आपण अडीच वर्ष शिवसेना आणि शिवसेनेचा धनुष्य-बाण हे चिन्ह घराघरात पोहचवले. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्याने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे आपल्याला इच्छा असूनही उमेदवारी देऊ शकले नाही. परंतु मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकांच्या भावना लक्षात घेऊन ही विधानसभा निवडणूक आपण अपक्ष लढलो. मिळालेले कपबशी चिन्ह दहा दिवसात मतदार संघातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम प्रामाणिकपणे सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाआघाडी अशी तुल्यबळ लढत होत असताना, आपण अपक्ष लढलो. याकाळात आपल्या विरोधकांकडे पक्षांचे बळ आणि पैशाची मोठी ताकद असतानाही,  तुमच्या सर्वांच्या उत्साही ताकदीपूढे ते हतबल झाले होते हे विसरून चालणार नाही. आपल्या  सोबत तर कोणता पक्ष नाही, चिन्ह नाही, सभेला मोठा नेता नाही, की कुणाचे जाहीर पाठबळही पाठीशी नव्हते. याची जाणीव असतानाही गेवराई विधानसभा मतदार संघातल्या लाखो माता-भगिनींनी  माझ्यावर प्रेम व्यक्त केले. 50 हजार मतदारांनी मतदान करून आशीर्वाद देत आपल्यावर विश्वास टाकला आहे, हे काही कमी नाही. त्यामुळे जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी झालेला पराभव विसरून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्व सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आजपासूनच कामाला लागावे. गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकारणात याच मतदारसंघातील लोकांनी मला भरभरून प्रेम देत डोक्यावर घेतलेले आहे. ही माणसं टिकली पाहिजेत. त्यांच्यासमोर आलेली संकटे, अडीअडचणी आपल्या माध्यमातून सोडवल्या गेल्या पाहिजेत, असे सांगून बदामराव पंडित म्हणाले की, निवडणुकीत हार, जीत होत असते. जिंकलो म्हणजे गर्वाने कधी राहायचे नसते आणि हरलो तर त्याने कधी खायचे नसते. आपण या पराभवाने किंचितही खचलो नाही. येणाऱ्या काळात गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात शिवसेना मजबूत करायची आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी अधिक गतीने, नियोजन बद्दल काम करण्यासाठी सर्व शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहनही माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे. यावेळी भेटण्यासाठी आलेल्या गहिवरलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी बळ दिले. गेवराई शहरातील शिवसेना भवनातून आपला संपर्क कायम सुरू राहणार असल्याचे सांगून, 50 हजार मतदार, कार्यकर्ते व पत्रकारांचे आभार मानून, मतदारसंघातील कोणत्याही माणसाला गरज भासली तर माझ्या कार्यालयाचे आणि घराचे दरवाजे 24 तास आपल्या सेवेसाठी उघडे राहतील असेही यावेळी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी म्हटले आहे. याप्रसंगी जि प सभापती युधाजित पंडित, युवानेते रोहित पंडित, यशराज पंडित यांच्यासह गेवराई मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....