युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या
बदामराव पंडित तातडीने मुंबईत तर संपर्कप्रमुख गेवराईत दाखल

=================
भाजप पदाधिकारी शांत मात्र लक्ष्मणसेना संभ्रमात
====================
गेवराई ( प्रतिनिधी ) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भाजप यांची युती जाहीर होताच, गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने बोलवलेल्या बैठकीसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे मुंबईत तर दुसऱ्याच दिवशी जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव गेवराई तालुक्यात दाखल झाले आहेत. यामुळे शिवसैनिकात उत्साह पहायला मिळत आहे.
            राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा शिवसेना व भाजपने निर्णय जाहीर केला आणि एकदाची युती जाहीर झाली.  राज्यात शिवसेना-भाजपच्या झालेल्या युतीमध्ये सत्तेत समान वाटा दोघांचाही असेल, असे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आले. युती जाहीर होताच गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत.  मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी उपस्थिती लावली. या बैठकीत विविध विषयांवर विशेषतः गेवराई विधानसभा मतदार संघाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे सचिव आ संजय नार्वेकर यांनी जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांना तात्काळ गेवराई विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी पाठवले आहे. दिनांक 25 फेब्रुवारी रोजी बिड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी सकाळी 11 वाजता बदामराव पंडित यांच्या निवास्थानी शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तर देवकी देवकी आणि तलवाडा या दोन्ही जिल्हा परिषद सर्कल मधील शिवसेना पदाधिकार्‍यांची तलवाडा येथे दुपारी दोन वाजता बैठक घेतली. त्यानंतर रात्री सात वाजता टाकरवन सर्कल मधील शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक, महिला मेळावा आणि महिला आघाडीची शाखा शुभारंभ असे विविध संघटन मजबुतीचे कार्यक्रम घेऊन थेट लोकांशी संवाद साधला. ठीकठिकाणी बोलताना जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी, गेवराई  आणि बीड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी फिक्स असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आणखी एक मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. माजी मंत्री बदामराव पंडित हे चाणाक्ष आणि दूरदृष्टीचे लोकनेते असल्याचे सांगून ते म्हणाले की, राज्यात शिवसेना-भाजप युती आत्ता जाहीर झाली आहे. परंतु बदामराव पंडित यांनी बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वीच शिवसेना-भाजप युती करून शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषद मध्ये फडकावला आहे. आता त्यांच्या रूपाने शिवसेना- भाजप युतीचे गेवराईतील आमदार म्हणून बदामराव पंडित हे विधानसभेत पोहोचणार आहेत. तुम्ही आमदार करा मी त्यांना नामदार करतो असा शब्द पक्ष प्रवेशावेळीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याने, राज्यात सत्ता येताच बदामराव पंडित हे शिवसेनेकडून  मंत्री राहतील असा विश्वासही त्यांनी शिवसैनिक आणि ग्रामस्थांना दिला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. दिवसभर अनेक गावांना भेटी देऊन आनंदराव जाधव, बदामराव पंडित, कुंडलिक खांडे यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. विशेषतः गेवराई विधानसभेची जागा बदामराव पंडित यांना सोडली असल्याचे संकेत मिळताच काही भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. आम्ही आपल्या सोबतच आहोत अशी ग्वाहीही या पदाधिकाऱ्यांनी बदामराव पंडित यांना दिली आहे. गेवराईत शिवसेनेच्या वाढलेल्या हालचालीमुळे भाजपाचे पदाधिकारी "वेट अँड वॉच" म्हणत शांत आहेत. परंतु भाजपात असूनही आ लक्ष्मणराव पवार यांच्या नावाने "लक्ष्मण सेना" तयार करून काम करणारे पदाधिकारी मात्र बेचेन आणि संभ्रमात असल्याचे दिसत आहेत.
जिल्ह्यात पालकमंत्री ना. पंकजाताई मुंढे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बीडचा खासदार भाजपचा तर विधानसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघावर बदामराव पंडित यांच्या रूपाने युतीचाच भगवा फडकेल असा विश्वास सेना-भाजपाचे पदाधिकारी व्यक्त करताना दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....