लक्ष्मण सेनेच्या झेंड्याला गडकरींचा दांडा ना पंकजाताई मुंडेंना आ लक्ष्मण पवारांचा पुन्हा शह

गेवराईत लक्ष्मण सेनेच्या झेंड्याला गडकरींचा दांडा लावून
ना पंकजाताई मुंडेंना शह देण्याचा आ लक्ष्मण पवारांचा प्रयत्न
====================================
●  ना नितीन गडकरींचा दौरा रद्द होण्याची शक्यता ●
====================================

बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच खऱ्या अर्थाने राजकीय टक्कर नेहमीच दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकानिहाय वेगवेगळे नेते काम करत असले तरी परस्परांचे नेतृत्व मान्य करायला ते तयार नाहीत. दुसरीकडे मात्र भाजपाचे सर्व तालुक्यातील आमदार आणि नेते यांच्यावर पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाची छाप आहे. त्यामुळे पक्षातील इतर नेत्यांना जिल्ह्यात आणून ना पंकजाताई मुंढे यांना आव्हान देण्याचे धाडस एव्हाना कुणी करताना दिसत नाही. परंतु गेवराईचे आमदार लक्ष्मणराव पवार यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना आपल्या मतदारसंघात आणून पुन्हा एकदा पालक मंत्री ना पंकजाताई मुंडे यांना शह देण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात होत आहे. एकंदरीत लक्ष्मण सेनेच्या झेंड्याला गडकरींचा दांडा लावण्याचा आ पवार प्रयत्न करीत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
            एकेकाळी भाजपाचे सर्वेसर्वा असलेले महाराष्ट्रातील लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये स्वर्गीय मुंडे यांच्या निधनाबद्दल अनेक उलट-सुलट चर्चा झाल्या. याचा परिणाम त्यांच्या अंत्यविधीला आलेल्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांना भोगावा लागला. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर त्यांच्या कन्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांना रणरागिनी संबोधून जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील लाखो लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे चित्र संपूर्ण देशाने पाहिले आहे. अशा स्थितीत बीड जिल्ह्यात प्रस्थापित राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकमेव पंकजाताई मुंडे यांनी भाजपकडून जबरदस्त टक्कर देत जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार निवडून आणले आहेत. आज जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री प्रकाशराव सोळंके, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित हे प्रस्थापित आणि मातब्बर नेते असले तरी प्रत्येकाचे एकमेकांशी पटत नसल्याने, कोणीही कोणाचे नेतृत्व जिल्ह्यात मानायला तयार नाही. त्यामुळे अनेक वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. किंबहुना यश मिळविण्यासाठी प्रत्येक वेळी या पक्षातून त्या पक्षात अशा कोलांट उड्याही अनेकांना माराव्या लागल्या आहेत. दुसरीकडे मात्र पालक मंत्री पंकजाताई मुंडे या भाजपच्या नेत्या म्हणून जिल्ह्यातील सर्व भाजपचे नेते त्यांना स्वीकारत आहेत. असे असताना शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांनी भाजपकडून आमदारकी मिळवली असली तरी वेळोवेळी पंकजाताई मुंडे यांना विरोध करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यापाठोपाठच गेवराई चे भाजप आ लक्ष्मणराव पवार यांनी आपला स्वाभिमान दाखवत अनेक वेळा आपल्याच पक्षाच्या नेत्या आणि पालकमंत्री असलेल्या पंकजाताई मुंडे यांचा शब्द न ऐकून, शह देण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करताना ना पंकजाताई चा शब्द न मानणे, आ विनायकराव मेटे हे पंकजाताईच्या विरोधी भूमिका घेत असताना गेवराई येथे झालेल्या शिवसंग्रामच्या कार्यक्रमास आ लक्ष्मणराव पवार यांनी पाडळशिंगी येथील आपल्या मालकीच्या असलेल्या स्व माधवराव पवार खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा त्यांच्या कार्यक्रमासाठी देवुन या कार्यक्रमाला आपले नगराध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना पाठवणे. जिल्हा नियोजन बैठकीत स्वतः अध्यक्ष असताना पंकजाताईंच्या  उपस्थितीत झालेल्या बैठकीत निषेध व्यक्त करत पाणी प्रश्नावर बैठकीतून निघून जाणे, परळीत आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला तसेच ना पंकजाताईंच्या सलग 3 वर्षे दसरा मेळाव्यास  गैरहजर राहणे आणि त्यानंतर मात्र विनायकराव मेटे यांना आपल्या घरी बोलावून त्यांचा सत्कार करणे. अशा विविध घटनांमधून आ लक्ष्मणराव पवार यांनी ना पंकजाताई मुंडे यांना शह दिल्याची भावना भाजपचे कार्यकर्ते व मुंडे भक्तांमध्ये आहे. समज-गैरसमजातून मुंडे भक्तांमध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याविषयी प्रचंड नाराजगी असताना, आता राष्ट्रीय महामार्ग व टोल नाक्याच्या शुभारंभासाठी आणि गेवराई सभा घेण्यासाठी लक्ष्मण पवार हे नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेवराईत आणत असल्याचे वृत्त वर्तमान पत्रातून सर्वत्र पसरले आहे. जिल्हा परिषद मध्ये भाजप सोबत शिवसेनेची युती झाल्याने  मध्यंतरी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी एका कार्यक्रमादरम्यान आ लक्ष्मणराव पवार यांच्या घरी न जाता शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्नेह भोजन घेतले होते. त्यातच राज्यात आता शिवसेना  - भाजपची युती झाल्याने आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेत्यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघावर आपला हक्क जाहीर केला आहे. ना पंकजाताई मुंडे आणि  बदामराव पंडित यांचे संबंध चांगले असून येत्या विधानसभा निवडणुकीत गेवराईची जागा शिवसेनेला सुटेल तेव्हा पंकजाताई याहि बदामराव पंडित यांना मदत करतील, अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात ऐकायला मिळत आहे. अशावेळी भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर करायचे काय ? असा प्रश्न आ पवारांच्या  कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आणि त्यांनी लक्ष्मण सेनेची स्थापना करून पदाधिकारीही नियुक्ती केले. आता या लक्ष्मण सेनेचा झेंडा कोणता आणि दांडा कोणता ? ही चर्चा होत असतानाच, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत गेवराई तालुक्यात कार्यक्रम होणार असल्याने, लक्ष्मण सेनेच्या झेंड्याला गडकरींचा दांडा लावण्याचा प्रयत्न आ पवारांकडून होत असल्याची चर्चा जनसामान्यात होत आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....