ना पंकजाताई मुंडे यांची किमया भारी लक्ष्मणराव पवार - बदामराव पंडित एकाच गाडीत

पंकजाताई मुंडे यांनी जादूची कांडी फिरवली
लक्ष्मण पवार - बदामराव पंडित एकाच गाडीत
====================
कार्यकर्त्यांचे मात्र अद्यापही मनोमिलन नाही

====================
बीड ( प्रतिनिधी ) पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  जादूची कांडी फिरवली असून, गेवराईत एकमेकांविरुद्ध लढलेले भाजप आ लक्ष्मणराव पवार आणि शिवसेना नेते बदामराव पंडित या दोघांनाही एकाच गाडीत बसवून युतीच्या उमेदवार प्रीतमताई मुंडे या आपल्या भगिणीचा उमेदवारी अर्ज दाखल करत आपली राजकिय किमया दाखवून दिली आहे.
            लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे राजकीय जादूची कांडी असल्याची चर्चा नेहमीच कोणत्याही आलेल्या निवडणुकीमध्ये ऐकायला मिळायची. परंतु हीच जादूची कांडी आता त्यांची कन्या पालक मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात फिरवायला सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मणराव पवार आणि बदामराव पंडित हे एकमेकांविरुद्ध निवडणूक लढले होते. या दोघांमधून विस्तूही आडवा जात नाही असे चित्र भासत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात भाजप-शिवसेना युती झाली आणि या युतीकडून बीड लोकसभा मतदारसंघात डॉ प्रीतमताई मुंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. दि 25 मार्च रोजी बीड येथे आ लक्ष्मणराव पवार व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित या दोन्ही नेत्यांना एकाच गाडीत बसवून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी प्रीतमताई मुंडे या आपल्या बहिणीचा उमेदवारी अर्ज विराट रॅली काढून दाखल केला. एवढेच नाही तर रॅली नंतर झालेल्या भव्य सभेत भाजपा आ लक्ष्मणराव पवार आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी एकाच स्टेजवरून जिल्हाभरातून आलेल्या लाखों कार्यकर्त्यांना संबोधित करून, पालक मंत्री पंकजाताई मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रीतमताई मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहनही केले. पंडित पवार यांच्या भूमिकेत झालेल्या या बदलामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.  आता प्रीतमताई मुंडे यांना गेवराई विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वासही जिल्ह्यातून व्यक्त होऊ लागला आहे. यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते बदामराव पंडित, जि प सभापती युधाजित पंडित आणि आ लक्ष्मणराव पवार यांनी युतीच्या उमेदवार प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी वेगवेगळे दौरे करून  वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे. असे असले तरी मध्यंतरी विकास कामाच्या शुभारंभासाठी गेवराईत आलेल्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी, लक्ष्मण पवार यांना उमेदवारी जाहीर करा म्हणत, घोषणा देणाऱ्या पवार यांच्या कार्यकर्त्यांना वेडे आहात का ? पागल कुठले, असे म्हणत त्यांना झापल्याने या कार्यकर्त्यांच्या मनात ना पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल राग असल्याचे दिसत आहे. काही अंशी याचा फटका प्रीतमताई मुंडे यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्याबाहेर ना पंकजाताई मुंडे यांच्या सोबत एकाच गाडीतून प्रवास करणारे बदामराव पंडित आणि लक्ष्मणराव पवार हे मात्र भाजप- शिवसेना युती झालेली असतानाही, गेवराई तालुक्यात अद्यापही एकत्र आलेले नसून त्यांच्या कार्यकर्त्यांचेही मनोमिलन झालेले नाही हे दिसून येत आहे. प्रीतमताई मुंडे यांना विजयी करण्यासाठी आता पंकजाताई मुंडे यांची जादूची कांडी गेवराईत कधी फिरेल ? आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन कधी होईल ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....