पवार - पंडित दोघेही अडचणीत ; कार्यकर्त्यांची पक्षविरोधी भूमिका भोवणार

गेवराईत आ पवार व माजी आ पंडित दोघेही अडचणीत
कार्यकर्त्यांची पक्षविरोधी भूमिका भोवणार
====================

बीड ( प्रतिनिधी ) गेल्या आठवड्यात गेवराई झालेल्या कार्यक्रमात भाजप आ लक्ष्मणराव पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्या नंतर त्यांना वेडे, पागल म्हणाल्याने पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात आ पवारांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून आगपाखड केल्यानंतर आता बीड लोकसभा मतदारसंघातून  राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांना उमेदवारी न मिळाल्याने  माजी आ पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आगपाखड सुरू केली आहे. दोघांच्या कार्यकर्त्यांनी
चालवलेल्या पक्षविरोधी  हुल्लडबाजीमुळे गेवराईतील भाजपा व राष्ट्रवादीचे पवार व पंडित हे दोन्ही आजी - माजी आमदार चांगलेच अडचणीत आले असून, असेच सुरू राहिल्यास पक्षनेतृत्वाची नाराजी दोघांनाही भोवणार हे नक्की.
          गेल्या आठवड्यात गेवराईत विकास कामांच्या उद्घाटनाचा शासकीय कार्यक्रम झाला. यात भाजप नेत्या, पालकमंत्री पंकजाताई मुंडे भाषणाला उभा राहताच आ लक्ष्मणराव पवार यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर करा म्हणत घोषणाबाजी केली. यामुळे संतप्त झालेल्या पंकजाताई यांनी त्या कार्यकर्त्यांना पागल कुठले, वेडे आहात का?  आ पवार या आपल्याच नेत्याच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका, असे म्हणत भरसभेत मीडियासह हजारो लोकांसमोर त्यांना  चांगलेच झापले. त्यानंतर आ पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ना पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात चांगलेच रान पेटवले आहे. याचा फायदा आता आपल्याला लोकसभा निवडणुकीत होईल या अपक्षेने राष्ट्रवादीचे माजी आ अमरसिंह पंडित यांनी पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती. आपल्या एव्हढा प्रबळ दावेदार कोणीही नसल्याने उमेदवारी आपल्यालाच मिळेल, या ठाम विश्वासाने अमरसिंह पंडित यांनी ना पंकजाताई मुंडे यांच्यावर पत्रकार परिषदेत तोंडसुखही घेतले. त्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही शरद पवारांचे गोडवे गात सोशल मीडियावर ना पंकजाताई गेवराईतील लोकांनाच वेडे, पागल म्हणाल्याची आवई उठवत ना मुंडेंना चांगलेच धारेवर धरले होते. मात्र याचवेळी बीडसाठी अमरसिंह पंडित यांना बाजूला सारून जि प गटनेते बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली. यामुळे संतप्त झालेल्या अमरसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांची "तळ पायाची आगच मस्तकात गेली" आणि त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्याच वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात सोशल मीडियावरून आगपाखड सुरू केली. एव्हढ्यावरच न थांबता आपल्याच पक्षाने उमेदवारी दिलेल्या बजरंग सोनवणे यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून निवडणूककित नोटा चे बटन दाबण्याचा निर्धार आणि प्रचारही सुरू केला.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेवराईतील या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्ष आणि नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारल्याने आ लक्ष्मणराव पवार आणि माजी आ अमरसिंह पंडित हे दोन्ही आजी - माजी आमदार चांगलेच अडचणीत आले असून, आपल्या कार्यकर्त्यांनी चालवलेला अपप्रचार न थांबवल्याने, दोघांनाही आपापल्या पक्ष नेतृत्वाचा रोष भोवणार हे नक्की. आता लोकसभेत प्रचार नेमका करायचा कोणाचा ? हा प्रश्न दोघांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....