गेवराई पं स च्या 7 योजनांसाठी 60 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी -- अभयसिंह पंडित

गेवराई पंचायत समितीच्या 7 योजनांसाठी
60 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी -- अभयसिंह पंडित
====================
पवार व पंडित हे आजी-माजी आमदार तोंडघशी पडले -- बदामराव पंडित
====================


गेवराई ( प्रतिनिधी ) ऐन दुष्काळात गेवराई तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी आणि काम करणाऱ्या मजुरांसाठी गेवराई पंचायत समितीने दाखल केलेल्या विविध सात योजनांमधील 2738 कामांना तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच सर्व कामे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील असा विश्वास पंचायत समिती सभापती अभयसिंह पंडित यांनी व्यक्त केला. तर विविध कामांमध्ये  राष्ट्रवादीच्या अमरसिंह पंडित  यांनी वेळोवेळी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तसेच आ लक्ष्मणराव पवार यांनी खोटी कागदपत्रे दाखल करून कार्यकर्त्यांना बोगस बिले उचलण्यासाठी केलेला मदतीचा प्रयत्न शिवसेना सरपंचांनी हाणून पाडला. त्यामुळे पवार व पंडित  हे आजी - माजी आमदार दोघेही  तोंडघशी पडले असल्याचे सांगून, आपण आमदार नसतानाही पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱयांसाठी 60 कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असल्याचे समाधान माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केले आहे.
          गेवराई पंचायत समितीच्या वतीने आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत बोलताना, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित  म्हणाले की, आपण आमदार नसतानाही गेवराई पंचायत समितीच्या वतीने दाखल केलेल्या प्रस्तावांना पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री ना दादासाहेब भुसे, सहकार राज्यमंत्री ना संजय राठोड यांनी दुष्काळात शेतकरी व शेतमजुरांच्या हिताच्या योजनांना तात्काळ मंजुरी दिली याचे आपल्याला समाधान वाटते. राष्ट्रवादीचे माजी आ अमरसिंह पंडित यांनी वेळोवेळी विकास कामांना अडथळा आणण्याचे काम केले. परंतु त्यांना यश आले नाही. त्यासोबतच आ लक्ष्मणराव पवार यांनी ग्रामपंचायत ताब्यात नसतानाही पंचवीस पंधरा च्या कामात गुत्तेदारांना खोटी कागदपत्र दाखल करण्यासाठी मदत केल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. त्यामुळे पवार व पंडित हे दोन्ही आजी-माजी आमदार जनतेसमोर तोंडघशी पडले आहेत असा घणाघाती आरोप बदामराव पंडित यांनी केला. ग्रामपंचायती सक्षम असताना, त्यांच्या अंतर्गत असलेली कामे ही त्यांनाच करू द्यावीत. त्यात इतरांनी लुडबूड करू नये असेही बदामराव पंडित यांनी विरोधकांना ठणकावले. तर सभापती अभयसिंह पंडित म्हणाले की, तालुक्यात गंभीर दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी, मजूर यांच्यासाठी गेवराई पंचायत समितीने दाखल केलेल्या विविध योजनेतील कोटयावधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले असून, लवकरच सदर कामे लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यात येतील.  माजी राज्यमंत्री बदामराव पंडित व जि प अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित यांच्या विशेष प्रयत्नाने राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री ना  दादासाहेब भुसे तसेच महसूल राज्यमंत्री ना संजय राठोड यांनी सदर कामांना मंजुरी दिली आहे. यात 71 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना वैयक्तिक जलसिंचन विहीर प्रत्येकी 3 लक्ष रुपये प्रमाणे 2 कोटी 13 लाख रुपये, 573 वैयक्तिक जलसिंचन विहीर प्रत्येकी 3 लक्ष रुपये प्रमाणे 17 कोटी 19 लक्ष रुपये, 369 वैयक्तिक शेततळे प्रत्येकी 2 लक्ष 75 हजार 562 रुपये प्रमाणे  10 कोटी 16 लक्ष 82 हजार 378 रुपये,  496 विहीर पुनर्भरण प्रत्येकी 29 हजार 883 रुपये प्रमाणे 1 कोटी 48 लक्ष 21968 रुपये,  1148 शोष खड्डे प्रत्येकी 64 हजार 150 रुपये प्रमाणे 7 कोटी 36 लक्ष 44 हजार दोनशे रुपये, 15 एलबीएस प्रत्येकी 18  लक्ष रुपये प्रमाणे 2 कोटी 70 लाख तर 64 बांधबंदिस्तीची कामे प्रत्येकी 15 लक्ष रुपये प्रमाणे 9 कोटी 60 लक्ष रुपये अशा एकूण सात योजनेतील 2736 कामांसाठी 50 कोटी 63 लक्ष 48 हजार 546 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्याचबरोबर जि प सभापती यूधाजित पंडीत यांच्या प्रयत्नाने गेवराई पंचायत समिती इमारतीसाठी 3 कोटी 50 लक्ष रुपये तर पं स  अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 4 कोटी 50 लक्ष रुपये अशा 8 कोटी रुपयांच्या कामांनाही मंजुरी मिळाली असून, त्याचे कामही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. पंचायत समितीच्या माध्यमातून तब्बल 60 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी घेणारी राज्यातली गेवराई पंचायत समिती ही एकमेव असल्याचे सांगून यासाठी जिल्हाधिकारी पांडे साहेब,जि प मुख्य कार्यकारी अधिकारी येडगे साहेब, उपविभागीय अधिकारी मुळे साहेब आणि गटविकास अधिकारी बागुल साहेब यांच्यासह पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी खूप मदत केल्याचे सभापती अभयसिंह पंडित यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस युवानेते रोहित पंडित, शिवसेना गटनेते बापूराव चव्हाण, सदस्य महादेव औटी, माजी जि प सभापती पंढरीनाथ लगड, तालुकाप्रमुख कालिदास नवले, माजी नगरसेवक अमोल करांडे यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....