गेवराई तालुक्यातील 25/15 च्या कामातील होणारा भ्रष्टाचार शिवसेनेच्या सरपंचांनी उघडकीस आणला


बोगस नाहरकत जोडून, मंजूर कामावर दुसऱ्यांदा काम टाकून
बोगस बिले उचलण्याचा गेवराईत प्रयत्न ; शिवसेनेच्या सरपंचांनी केली तक्रार
 ===================
उपविभागीय अभियंता व गुत्तेदाराचे संगनमत उघडकीस
====================
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या कामांसाठी संबंधित ग्रामपंचायतचे बोगस नाहरकत प्रमाणपत्र व देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र जोडून एकदा मंजूर झालेल्या कामावर पुन्हा दुसऱ्यांदा काम टाकून बोगस बिले उचलून भ्रष्टाचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुत्तेदार व उपविभागीय अभियंता यांच्या विरुद्ध शिवसेनेच्या सरपंचांनी लेखी तक्रार दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून कार्यकारी अभियंता यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून पुन्हा माहिती कळविण्याचे आदेश उपविभागीय अभियंता गेवराई यांनाच दिले आहेत.
           याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या कामांना संबंधित ग्रामपंचायतीकडून रीतसर ना हरकत प्रमाणपत्र न घेता, संबंधित 25/15 मधील कामांना बोगस ना हरकत प्रमाणपत्र जोडून कामाची मागणी करण्याचा आणि ती मंजूर करण्याचा प्रकार गेवराई तालुक्यात अनेक ठिकाणी घडला आहे. विशेषतः यातील अनेक कामे यापूर्वीच डीपीडिसी सारख्या दुसऱ्या योजनेतून मंजूर तर काही पूर्ण झालेली असताना त्याच कामावर ही कामे दाखवण्याचा प्रकारही शिवसेनेच्या सरपंचानी उघडकीस आणला आहे. गेवराई तालुक्यात असलेल्या ग्रामपंचायतीपैकी बहुतांश ग्रामपंचायती वर बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वर्चस्व आहे तर उर्वरित ग्रामपंचायतीवर अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे मोजक्या ठिकाणीच आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे वर्चस्व आहे त्यामुळे आपापल्या ग्रामपंचायती अंतर्गत विकास कामे व्हावीत यासाठी तिन्ही नेत्यांनी कंबर कसून काम केले आहेत. 25/15 ही योजना ग्रामपंचायतीने ग्रामपातळीवर काम करण्यासाठीची योजना आहे. याकामासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्य आहे. ज्यांच्या ताब्यात ग्रामपंचायती नाहीत, त्यांना नाहरकत मिळत नसल्याने या मंडळींनी ग्रामसेवकाचे खोटे रबरी शिक्के बनवून बोगस ना हरकत प्रमाणपत्र व देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र तयार करून, ते कामासाठी उपविभागीय अभियंता यांच्याकडे जोडले आहे.  विशेषतः याची खात्री करणे हे काम असतानाही  उपविभागीय अभियंता वाघस यांनी ते कार्यकारी अभियंता सानप यांच्याकडे तसेच मंजुरीसाठी पाठवले आहे. ही बाब माहित होताच, दि 1 मार्च रोजी कार्यकारी अभियंता बीड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, गोदावरी सिध्देश्वर काळे संरपंच गोळेगांव, युवराज जावध सरपंच पौळाची वाडी, काझी अमरीन इमाण सरपंच राक्षसभुवन, मुकुंद बाबर सरपंच राहीतळ, गोरी शाहीस्ता इमतीहाज सरपंच पाचेगांव, विदया जग्गनाथ काळे सरपंच ठाकर अड़गांव, राम रघुनाथ जाधव सरपंच राजणी - शिदवाडी,  स्वाती गणेश चहाण सरपंच गुळज, विकास रामा धुतडमल सरपंच पाडळशिगी, अर्चना सोपान टकाळे सरपंच माटगांव, अशोक रंगनाथ वजारे सरपंच धडराई, नवनाथ पारेकर सरपंच पाथरवाला बुद्रुक, संदीप जाधव सरपंच बोरगाव बुद्रुक, गवळणबाई आत्माराम काळे सरपंच औरंगपूर कुकडा, निर्मलाबाई रोहिदास चव्हाण सरपंच केकत पांगरी या शिवसेनेच्या सरपंचांनी गाव पातळीवर काम करण्यास आमची ग्रामपंचायत आणि आम्ही समर्थ आहोत. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीने ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणालाही परवानगी देऊ नये, असे निवेदन त्यांना दिले. त्याचबरोबर संबंधित कामे ग्रामपंचायतीसाठी असल्याने ते आम्हालाच करू द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. बोगस शिक्के  आणि सह्या करून  ना हरकत प्रमाणपत्र व देखभाल दुरुस्तीपत्र जोडणाऱ्या विरुद्ध  कडक कारवाई करावी  असे म्हटले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ उपविभागीय अभियंता यांना पत्र देऊन संबंधित ग्रामपंचायतीच्या ना हरकतीची पुनर्तपासणी करावी व ग्रामपंचायतच्या लेटरपॅडवर पुन्हा प्रस्ताव तयार करून पाठवावेत असे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे बोगसगिरी करणाराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. हा प्रकार उपविभागीय अभियंता आणि संबंधित गुत्तेदार यांच्या संगनमताने झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. यावर आता काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. याप्रकरणात आणखी मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता असून हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यावर शेकण्याची दाट शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....