नरेंद्र मोदींचा काँग्रेसमुक्तचा तर आ लक्ष्मणराव पवारांचा पंडितमुक्तचा नारा फसला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसमुक्त भारतचा तर
आ लक्ष्मणराव पवारांचा पंडितमुक्त गेवराईचा नारा फसला

====================
युती - आघाडी जाहीर झाल्यावर होणार "सावळा गोंधळ"
====================
    ●[ राजकीय आखाडा / दिनकर शिंदे, गेवराई ]●
====================
 भाजपानेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला काँग्रेसमुक्त भारतचा नारा आणि गेवराईतील भाजप आमदार लक्ष्मणराव पवार यांनी पंडितमुक्त गेवराई चा दिलेला नारा हे दोन्हीही फोल ठरले आहेत. कारण या नाऱ्या नंतर पाच राज्यात भाजपची सत्ता जाऊन कॉंग्रेसने सत्ता स्थापन केली तर गेवराईत ग्रामपंचायतीसह, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पंडितांची सत्ता आली त्यामुळे दोन्ही नारे फोल ठरल्याने देश आणि तालुकास्तरावरील राजकीय स्थिती यापुढे बदलताना दिसेल हे निश्चित.
            देशात दोन खासदार असलेला भाजपा हा पक्ष 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक जागी खासदार विजय झालेला पक्ष ठरला. त्यानंतर मात्र नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला आणि प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस कशी संपेल यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले. वेळप्रसंगी काँग्रेसी नेत्यांना भाजपात प्रवेश देऊन निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपाने काही अंशी काँग्रेसला अनेक ठिकाणी पराभूत केले. दरम्यान या काळात त्यांनी आपले मित्रपक्ष मात्र बऱ्याच अंशी नाराज केले. याचवेळी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीने प्रभावित झालेल्या मतदारांनी मात्र नंतर पाच राज्यातून भाजपला हद्दपार करत काँग्रेसच्या हाती सत्ता दिली. यामुळे भाजपाला मोठा हादरा बसला. भाजपा आता यातून सावरण्याचा आतोनात प्रयत्न करीत आहे हे असले तरी, काँग्रेस मधून आयात केलेले नेते यावेळी भाजपला सोडून केव्हा स्वगृही जातील याची खात्री त्यांनाही देता येत नाही. अशा स्थितीत भाजपाच्या नरेंद्र मोदींचा काँग्रेसमुक्त भारतचा नारा फसला हे त्यांच्या लक्षात आले. आपल्याला काँग्रेसमुक्त भारत असे म्हणायचे नव्हते तर काँग्रेसची सत्ता नको असे म्हणायचे होते असा केविलवाणा खुलासा मधल्या काळात नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून केला. अगदी याच प्रमाणे 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपात जाहीर प्रवेश केलेल्या गेवराईचे माजी आ स्व शाहूराव पवार यांचे नातू आणि माजी आ स्व माधवराव पवार यांचे पुत्र, नगरपरिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष लक्ष्मणराव पवार यांनी  देशात उसळलेली मोदींची लाट, लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि अपघाताने बदामराव पंडित व अमरसिंह पंडित यांच्या एकीचे तयार झालेले रिॲक्शन या सर्वांच्या ताकदीवर तब्बल साठ हजार मताधिक्‍याने विजयी होऊन आमदारकी मिळवली.  त्यानंतर लक्ष्मणराव पवार यांनी  यापुढे आता तालुक्यात पंडितांची सत्ता येणार नाही आणि पंडितमुक्त गेवराई तालुका केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे सडेतोड प्रतिपादन प्रत्येक सभेतून केले. दोन्ही पंडिताकडे कित्येक वर्षापासून काम करणाऱ्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पंडित मुक्तीचा नारा देत त्यांनी आपल्या गटात प्रवेश दिला. यावेळी गेवराईतील भाजपाही पंडितयुक्त भाजपा तयार करून करून नगरपालिकेत एक हाती सत्ता मिळवली. परंतु काही महिन्यातच सर्व लाटा विरल्या, अनेकांचा विरोधही मावळला तसा गेवराई तालुका पंडित मुक्त होण्याऐवजी पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह ग्रामपंचायत, बाजार समिती, खरेदी विक्री संघ या निवडणुकांमध्ये पंडितांची सत्ता पुन्हा स्थापन झाली. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पंडितांकडून आयात केलेले कार्यकर्ते आपल्याकडे किती दिवस टिकतील याची खात्रीही आमदार पवार देऊ शकत नाहीत, अशी स्थिती आज गेवराई तालुक्यात निर्माण झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दुरंगी झालेली निवडणूक यावेळी मात्र तिरंगी होण्याची शक्यता अधिक आहे.  तांत्रिक दृष्ट्या बदामराव पंडित व अमरसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेस या एका पक्षात राहूनही अमरसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी ऐनवेळी बदामराव पंडित यांना विरोध करून छुप्या पद्धतीने भाजपा आ लक्ष्मणराव पवार यांनाच मदत केल्याचा आरोप वेळोवेळी बदामराव पंडित गटाकडून केला जात आहे. जर असे असेल आणि आता तिरंगी फाईट होणार असेल तर लक्ष्मणराव पवार यांच्याकडे आतून मदत करणारे अमरसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आता कोणाला मदत करणार?  हा प्रश्न आ पवार आणि माजी आ अमरसिंह पंडित या दोघांनाही सतावत असेल. जर अमरसिंह पंडित यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा साथ दिली तर आपोआपच लक्ष्मणराव पवार यांना मिळालेली मते किती कमी होतील ? हे सांगायला कोण्या राजकीय जाणकाची गरज नक्कीच नाही. अशी स्थिती तालुक्यात पाहायला मिळत असतानाच पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ लक्ष्मणराव पवार यांच्या पेक्षा शिवसेना नेते बदामराव पंडित यांच्याशी अधिक जवळचे नाते गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झाल्याचे पावलोपावली गेवराईकरांना पाहायला मिळत आहे. एकंदरीत या स्थितीमुळे  लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग हा बदामराव पंडित यांच्या बाजूने झुकलेला  दिसत आहे. शिवसेना-भाजपा युती झाल्यास गेवराई तालुका हा शिवसेनेलाच सुटेल असा विश्वास शिवसेनेचे वरिष्ठ नेते स्पष्टपणे देत आहेत. असे झाले तर सेनेकडून बदामराव पंडित हे उमेदवार राहतील आणि लक्ष्मणराव पवार हे एक तर शांत बसतील किंवा अपक्ष लढतील याशिवाय त्यांच्याकडे तिसरा पर्याय राहणार नाही. दुसरीकडे मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तरी, गेवराईत मात्र काँग्रेस नसल्यात जमा असून, राष्ट्रवादीचीच ताकद अधिक असल्याने लोकसभेला राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित हे  तर विधानसभेला त्यांचेच भाऊ विजयसिंह पंडित हे उमेदवार असतील असा विश्वास तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. एकंदरीत गेवराई मतदारसंघातील स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसमुक्त भारतचा नारा फसला तसाच आमदार लक्ष्मणराव पवार यांचा पंडित मुक्त गेवराईचा नाराही फसला हे दिसून येत आहे. यावेळी विधानसभेत कोण बाजी मारेल आणि कोण कोणा सोबत राहील हा येणारा काळच सांगेल. त्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल हे निश्चित.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....