शिक्षक व शाळांची ही कोणती आदर्श शिक्षण पद्धती ?

हात आणि मानदुखेपर्यंत खरडपट्टीचा गृहपाठ देणाऱ्या
शिक्षक व शाळांची ही कोणती आदर्श शिक्षण पद्धती ?

===================

12 ते 15 पान लिखाणकामामुळे विद्यार्थी निरुत्साही
=============
            ● [ दिनकर शिंदे / गेवराई ] ●
निसर्गाच्या सानिध्यात, दऱ्याखोऱ्यात हसत, खेळत चिमुकल्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी रवींद्रनाथ टॅगोर,  शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. खऱ्या अर्थाने विद्यार्थी सर्व गुण संपन्न करायचा असेल तर त्याच्या मनाचा विचार करून त्याला शिकवा, असा संदेश त्यांनी दिला. मात्र आज याचा विसर पडलेल्या जिल्ह्यातील तथाकथित आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत मात्र विद्यार्थ्यांना खरडपट्टी करणाऱ्या गृहपाठाच्या शिक्षणपद्धतीने पार निरुत्साही करण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे अनेक विद्यार्थी हात आणि मानेसह मानसिकदृष्ट्या थकल्याने, गृहपाठ करतानाच डोळे झाकून आहे त्याच जागेवर पडत आहेत. यामुळे ही कोणती आदर्श शिक्षण पद्धती असा यक्ष प्रश्न सामान्य पालकांना पडला आहे.
          विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, उत्साह आणि आनंदाने त्यांनी प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा. वेगवेगळे ज्ञान आत्मसात करावे आणि स्वतः सोबत राज्य आणि देशाची प्रगती साधावी. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम शालेय स्तरावर राबविण्यात येत आहेत. आता तर सरकारने विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत शाळा आणि एक तास खेळासाठी मैदानावर सोडण्याचा अध्यादेश काढून सर्व शाळांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना कला, संगीत, क्रीडा या क्षेत्रांमध्ये भाग घेऊन नैपुण्य प्राप्त करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना शाळेच्या कारणाने त्या क्षेत्रात भाग घेता येत नाही. याची जाणीव झाल्याने शिक्षण विभागाकडून आता मुक्त शाळा सुरू करण्याचा संकल्पही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बोलून दाखवला आहे. या प्रशिक्षणासाठी जर विद्यार्थी जात असेल तर अशा विद्यार्थ्यांची थेट  परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र दुसरीकडे आदर्श शाळा व शिक्षण पद्धतीचा डांगोरा पिटणाऱ्या आणि देणगीच्या नावाखाली आडमाप पैसा वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील अनेक शाळांमधून मात्र आजही बालवाडीपासून पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांसह दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना घोकंपट्टी आणि दररोज वहीचे 12 ते 15 पानाचा गृहपाठ दिला जात आहे. एक तर सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत शाळेत वेगवेगळ्या विषयांच्या, वेगवेगळ्या शिक्षकांच्या तासिकेत अभ्यास करायचा. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. यामुळे आगोदरच थकलेला विद्यार्थी घरी येतो तोच त्याला गृहपाठ म्हणून वहीचे 12 ते 15 पान खरडपट्टीचे काम दिले जाते. वरून पुन्हा सदर गृहपाठ दुसऱ्याच दिवशी पूर्ण करून न आणल्यास, शिक्षा करण्याची तंबी ठोकली जाते. वास्तविक पाहता  हा आता गुन्हा ठरत आहे. तरीही  शिक्षणाचा आणि आदर्शतेच्या आवडून डांगोरा पिटणाऱ्या या शिक्षक आणि तथाकथित  शिक्षण संस्थानच्या शाळा  यांच्याकडून ही कृती दररोज अगदी सहजतेने घडताना दिसत आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना गृहपाठ किंवा लिखाण कार्य देऊ नये, असा हट्ट कोणत्याही पालकांचा निश्चितच नाही. परंतु तो संबंधित विद्यार्थ्याला झेपेल, सहन होईल आणि आनंदाने तो गृहपाठ पूर्ण करेल अशा स्वरूपाचा लिखाण असलेला ग्रहपाठ आवश्य मुलांना द्यावा अशी भूमिका पालकांची त्यासोबतच शिक्षण विभागाचीही आहे. परंतु आजच्या चढावढीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण आपलाच विद्यार्थी कसा पुढे जाईल ? यासाठी अतिरेकी प्रयत्न करताना दिसत आहे. हे विद्यार्थ्याची स्थिती आणि मनाच्या बाबतीत योग्य नाही. त्यामुळे शाळेतून विद्यार्थ्यांना विविध विषयाचे आणि क्षेत्राचे ज्ञान देताना संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तत्सम शिक्षणाची पदवी पात्र प्रशिक्षितच असावा याची काळजी शाळेने आणि पालकांनीही घेणे आवश्यक आहे.   चिमुकल्यांना खेळत बागडत त्याची स्वयं इच्छाशक्ती जागृत करून शिक्षकांनीही योग्य ती नवनवीन माहिती घेण्यास त्यांना प्रवृत्त करावे. नसता घोकंपट्टी आणि खरडपट्टी करणारी निरुत्साही भावी पिढी आपणास पाहायला मिळेल अशी मनात  भीती वाटते. म्हणूनच हा केलेला पंचनामा.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....